मलाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
निस्सार शेख | मुंबई : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या साधी नाही. यामागे राजकीय षडयंत्र आहे. अनेक तपास यंत्रणांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप संजय राऊत यांनी करून मलाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या साधी नाही. यामागे राजकीय षडयंत्र आहे. वारिसे यांच्या हत्येवेळी आजूबाजूचे तीन सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे होते, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचा नि:पक्षपणे तपास होईल का याबाबत शंका आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, तरूण पत्रकार मारण्यात आला, हे धक्कादायक असून लोकांची भूमिका मांडणाऱ्या पत्रकाराला मारणे गंभीर बाब आहे. महाराष्ट्राची थरकाप उडवणारी ही घटना आहे. अशा घटना बिहारमध्ये होत होत्या. आता महाराष्ट्राचा बिहार झाला आहे की, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मागे कोण आहे याचा तपास होणे आवश्यक आहे. राज्यात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था कशी आहे, ते आपण पाहत आहे. या हत्येच्या कटात कोण सहभागी आहे, याचा तपास होणे गरजेचा आहे. कारण सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीत ११ अधिकारी कोण आहेत, हे समजले पाहिजे. वारिशे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सरकारने ऐकला पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला ५० लाखांची सरकारने मदत द्यावी, अशी मागणी यावेळी राऊत यांनी केली.
राज्य सरकार याप्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणला जात आहे. लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दहशत पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात लोकशाही आहेच कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. बीबीसीवरील छापे हे माध्यमांना दिलेल्या इशारा आहे. केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस दिली जात आहे. तुम्हाला माणसं संपविण्यासाठी सत्तेवर आणले आहे का, असा संतप्त सवाल राऊत यांनी केला.