सुषमा अंधारेंबद्दल संजय शिरसाटांना आदर; भुमरेंनी केली पाठराखण
अभिराज उबाळे | पंढरपूर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे प्रकरणी संजय शिरसाट यांना पोलिसांची क्लीन चिट मिळाली आहे. यावरुन सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. या वादावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदिपान भुमरे यांनी संजय शिरसाट असे काही बोललेच नाही, असे म्हणत त्यांची पाठराखण केलेली आहे.
संजय शिरसाट असं काहीही बोलले नाहीत. मीही त्या स्टेजवर होतो. ताई म्हणूनच आम्ही त्यांचा उल्लेख करत असतो. सुषमा अंधारे यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनाही आदर आहे, असे संदिपान भुमरे म्हणाले आहेत. गावरान शब्द असतो तो बोलला की अर्थाचा अनर्थ केला जातो. मराठी भाषा आहे जशी वळवेल तशी वळते. संजय शिरसाटांना क्लीन चिट तपासणी करूनच दिली असेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
२०२४ मध्ये सुद्धा पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळावरून कोणीही आमदार नाराज नाही. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. न्यायालयामुळे कोणताही उशिर झाला नाही. लवकरच विस्तार होईल, असेही भुमरे यांनी सांगितले.
दरम्यान, संजय शिरसाटांना क्लीनचिट दिल्याने सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले होते. संजय शिरसाट यांना क्लीन चिट कशी दिली हे मला समजेल का? तुम्ही वकील आहात मला, जरा समजून सांगाल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. महिला आयोगाकडे अहवाल न पोचताच तो आरोपीकडे कसा? यासंबंधी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अंधारेंनी केली होती.