Video : मी काय कुणाला घाबरतो! भुमरे आणि दानवेंमध्ये जोरदार वादावादी
सचिन बडे | छत्रपती संभाजी नगर : नवीन सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते यांच्यात कधीच जमलं नाही. अशातच छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला.
छत्रपती संभाजी नगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे गटाचे आमदार, भाजप आमदार आणि ठाकरे गटाचे आमदारही उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळ स्वतःची जहागीर असल्यासारखे पालकमंत्री वागत असल्याचा अंबादास दानवे यांनी केला. कारण होते ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केलेले अर्ज कचऱ्यात टाकता आणि चुटुर-मुटुर कार्यकर्त्यांची शिफारशीला मंजुरी देता यामुळे हा वाद निर्माण झाला.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एवढे भडकले जणू असं वाटत होतं की कुणाला मारतात की काय? मी काय कुणाला घाबरतो ! मी बिंदास भांडेल अशी भूमिका विरोधी पक्षाने त्यामध्ये जाणून घेतली आहे, मुद्दाम निधी वाटपात ठाकरे गटाला टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप अंबादास दानवे यांनी केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक होत स्वतःच्या खुर्चीवरून उठले आणि जोरजोरात भांडू लागले जणू काय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदे गटाच्या आमदारांवर धावून जात होते, मात्र पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणतात की माझ्या अंगावर कोणी धावून आले नाही. हे भांडण नसून विरोधी पक्षनेत्यांचे काम आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी जर आवाज नाही वाढवला तर मग त्यांना विरोधी पक्षनेता कोण म्हणणार, असे संदीपान भुमरे यांनी म्हंटले आहे.