आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर कधीच होऊ देणार नाही; इम्तियाज जलील संतप्त
Sambhajinagar Imtiaz Jaleel : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. याशिवाय उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव केले जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला. या दोन्ही शहरांच्या बहुप्रतीक्षित मागण्यांना अखेर कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले. (Sambhajinagar Imtiaz Jalil criticizes Uddhav Thackeray)
यावर प्रतिक्रिया देताना AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जाता जाता नीट जायला हवं होतं. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्याची काहीही आवश्यकता नव्हती. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर कधीच होऊ देणार नाही. आमचे मार्ग अजूनही बंद झालेले नाहीत, अशा आक्रमक शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत नामांतरप्रश्नी दोन हात करण्याची तयारी दाखवली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतरासह अनेक निर्णयांचा सपाटा लावला. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली.