Sambhaji Raje : वाघाचे कातडे पांघारल्यानंतर वाघासारखे दिसता येते, पण...
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे (MahaVikas Aghadi) मतं असतानाही भाजपच्या धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच सहाव्या जागोसाठी प्रयत्न केलेले छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
संभाजी राजे यांनी संत तुकाराम यांच्या अभंगातील काही ओळी ट्विट केल्या आहेत. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय. म्हणजेच वाघाचे कातडे पांघारल्यानंतर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखे गुण अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते, असा या अभंगाचा अर्थ असून संभाजीराजेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष लढणार असल्याचे घोषित केले होते. परंतु, पक्षात प्रवेश केल्यावरचत पाठिंबा देण्याची ऑफर शिवसेनेने संभाजीराजे यांना दिली होती. परंतु, संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम होते. परंतु, आम्ही आमची मते अपक्षाला देणार नाही असे म्हणत शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली. मात्र, पुरेशी मते असतानाही संजय पवारांचा आज पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.