शिवभक्तांना अडवाल तर परिणाम चांगले होणार नाही; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा
पुणे : रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्य सरकारकडून जोरदार तयारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडावर जाताना कोणत्याही परिस्थितीत शिवभक्तांना अडवून चालणार नाही. शिव भक्तांना अडवाल तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशाराच संभाजीराजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. नाटकीपणा दिसतो तो कमी नसावा. सोहळा हा पारंपरिक असावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
राज्याभिषेक सोहळा पूर्णपणे अराजकीय आहे. आत्तापर्यंत त्याला राजकीय स्वरुप दिलेलं नाही. शिवराज्याभिषेक सोहळा या वर्षी अत्यंत महत्वाचा आहे. हा सोहळा लोकउत्सव व्हावा, जगभर पोहोचवा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आज या सोहळ्याला लाखो लोक येतात. या सोहळ्याच्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत.
पाच जूनला आम्ही स्वतः स्वागत झाल्यावर किल्ला चढायला जाणार व याची सुरुवात नाणे दरवाज्यामधून करणार आहे. गडपूजन २१ गावातल्या ग्रामस्थांना दिलेला आहे त्यांच्या हस्ते होणार आहे. सरकारला सूचना दिल्या आहेत, असे संभाजीराजेंनी सांगितले.
सोहळ्यात नाटकीपणा दिसतो तो कमी नसावा, अशी आमची मागणी आहे. सोहळा हा पारंपरिक असावा. गडावर जाताना कोणत्याही परिस्थितीत शिवभक्तांना अडवून चालणार नाही. शिव भक्तांना अडवाल तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असेहू त्यांनी म्हंटले आहे.
शिवराज्याभिषेक तिथी आणि तारखेचा काही वाद नाही. या सोहळ्याची व्याप्ती वाढवायची असेल तर सोहळा ६ जूनला होत आहे. त्याच दिवशी व्हायला हवा. गडाच गडपण शून्य व्हायला नको. ते जपलं जावं, अशीही सूचना संभाजीराजेंनी शिंदे-फडणवीसांनी केली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी किल्ले शिवनेरीवरही शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आले. यावर संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गडकिल्ले संवर्धनाच्या मुद्द्यावरूनही सरकारला खडे बोल सुनावले होते. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी आजच्या सूचना केल्या आहेत.