अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल, संभाजीराजे छत्रपती आक्रमक
राज्यात सध्यस्थितीत अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे. मात्र महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यावरच आता राजकरण तापलेले असताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले आहेत. त्यावरच आक्रमक होताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल. असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.