राम नवमीवरुन कोल्हापुरात हसन मुश्रीफ-समरजित सिंह घाटगे आमने-सामने

राम नवमीवरुन कोल्हापुरात हसन मुश्रीफ-समरजित सिंह घाटगे आमने-सामने

Published by :
Saurabh Gondhali
Published on

सध्या राज्यामध्ये मशिदीवरील भोंगे व हनुमान चालीसा या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र कोल्हापूरमध्ये वेगळाच वाद पाहायला मिळतोय. कोल्हापूरमध्ये समरजित सिंह घाटगे यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रामाच्या नावाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच स्वतःचा जन्म तिथीनुसार रामनवमीला झाल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली असा देखील आरोप घाटगे यांनी यावेळी केला आहे.

10 एप्रिलला देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली. याच दिवशी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवसदेखील होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून तसेच वर्तमानपत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या होत्या.या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडले होतं आणि राम नवमीच्याही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

यावरून भाजप नेते समरजीत घाटगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ स्वत:ला रामाच्या बरोबर समजू लागले आहे का? असा सवाल घाटगे यांनी केला आहे. तसेच प्रभू श्री रामाचा एकेरी उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी बहुजन समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्यामुळे आपण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांविरोधात मोर्चा काढणार असून पोलिसांत तक्रारदेखील दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या मोर्चात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com