दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण... सामनातून टीका
पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. याच पार्श्वभूमीवर सामनातून भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.
सामनातून म्हटले आहे की, अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे २४ तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे २४ तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास २४ तास काम करणे असे म्हणता येत नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गंमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भाजपाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल.
तसेच शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील त्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे ‘२४ तास काम व पुढचे ७२ तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते. अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. असे म्हणत सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.