पंतप्रधान मोदींच्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांवर सामनातून निशाणा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने आज १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून मोदी - पवारांवर टीका करण्यात आली आहे.
सामनातून म्हटले आहे की, पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसव्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार खास व्यासपीठावर उपस्थित राहतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. शरद पवारांचे लोक भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे त्यांनी हजारो कोटींचे आकडे देऊन सांगितले. आज टिळक पुरस्कार स्वीकारताना हे सर्व भ्रष्टाचारी वगैरे लोक पुण्यात मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणार आहेत.
पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात थोडी जरी चीड असती तर "अशा भ्रष्ट वगैरे लोकांच्या हातून मी टिळकांच्या नावे पुरस्कार स्वीकारणार नाही....... तसंच यापैकी एकही व्यक्ती मंचावर किंवा मंडपात असता कामा नये, असे त्यांनी आयोजकांना बजावून सांगायला हवे होते. याचा दुसरा अर्थ असा की, मोदी व त्यांच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच आहेत व फक्त पक्ष फोडण्यासाठीच त्यांनी हे आरोप केले व लोकांत भय निर्माण केले. महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरे तर लोकांच्या मनात आपल्याविषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवारांना साधता आली असती. निषेध म्हणून शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती. असे सामनातून म्हटले आहे.