शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच दसरा मेळावा; शिंदे गटाचा अर्ज मागे
ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर सभा कोणाची होणार हा वाद सुरु आहे. अशातच, सदा सरवणकर यांनी ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे. दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण असून शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो, असे ते म्हणाले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंडपणे जनतेसमोर मांडले आहेत. यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात साजरा व्हावा व हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी दुसरी जागा निवडली असल्याचं सरवणकरांनी सांगितले आहे.
तसेच, सभा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली. त्याबद्दल सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक व हिंदु जनतेच्या वतीने आभार मानले आहेत. तसेच सूचनेनुसार दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा, अर्ज मागे घेत आहोत, असे सदा सरवणकरांनी म्हंटले आहे.