एकदा काय ते होऊनच जाऊ द्या; सचिन अहिरांचे कंबोज यांना आव्हान
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरचं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सोबत दिसणार असल्याचे खळबळजनक ट्विट केले होते. यावर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी निशाणा साधला असून एकदा काय ते चर्चा होऊनच जाऊद्या, असे थेट आव्हान दिले आहे.
सचिन अहिर म्हणाले, या अगोदरचे ट्वित होते त्यांचं काय झालं. सरकारला पाठींबा देणाऱ्या आमदारांचे तुम्ही काय करणार आहेत. आधीच्या ट्विटचं काय झालं. सगळ्यांना कळायला लागलं आहे की कशात तथ्य आहे. एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.
आजचे अधिवेशन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलं पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शिवसेनेने अधवेशनासाठी व्हिप जारी केला आहे. यावर बोलताना अहिर म्हणाले, न्यायालीन लढाई सुरु आहे. अधिवेशनाचा भाग म्हणून व्हीप काढला जातो. आमचे मुख्य प्रतोद यांनी व्हीप बजावलेला आहे. हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. ज्या प्रक्रिया आहेत त्या कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आता विरोधक म्हणून त्यांच्यात एकजूट राहणार का, या प्रश्नाचे उत्तरही या अधिवेशनात मिळणे अपेक्षित आहे.