आजचा भाजप म्हणजे मोदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी; सामनातून हल्लाबोल
ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, हिंदू संस्कृती व मोदींच्या नव्या सनातन धर्मात कुटुंब, परिवार, एकत्र कुटुंब पद्धती यास महत्त्व आहे, पण मोदींचा धर्म वेगळा आहे. मोदी तेलंगणात जाऊन परिवारवाद, खासगी कंपन्यांचा पक्ष यावर टीका करतात, पण विसंगती अशी की, ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय परिवारवादावर बोलत नाहीत. आंध्रात व ओडिशातील परिवारवादी पक्ष एखाद्या प्रायव्हेट कंपनीप्रमाणे चालवले जात आहेत व या कंपन्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदी हे परिवारवादासंदर्भात किती ‘ढोंगी’ भूमिका घेत आहेत ते स्पष्ट होते.मोदी यांनी राजकीय घराण्यांना ‘प्रायव्हेट कंपनी’ म्हटले. या प्रायव्हेट कंपन्यांना जनतेशी घेणेदेणे नाही असा श्री. मोदींचा रोख आहे, पण सत्य असे की, यातील बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या भाजपने चालवायला घेतल्या आहेत. भाजपने देशातील अनेक घटनात्मक संस्था या स्वतःच्या प्रायव्हेट कंपन्या असल्याप्रमाणेच चालवल्या आहेत व देशाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मुळात भारतीय जनता पक्षाचीच आज एक प्रकारे प्रायव्हेट कंपनी झाली आहे. या कंपनीचे खरे संस्थापक लालकृष्ण आडवाणी यांना अडगळीत फेकून या कंपनीचा ताबा घेण्यात आला व पक्षावर एक प्रकारे मालकी हक्क प्रस्थापित केला गेला.
तेलंगणात मोदी यांनी भारत राष्ट्र समिती व काँग्रेसवर प्रहार केला. ज्याला कुटुंब आहे त्याला भावना आहेत, भावना आहेत म्हणजे परिवार आहे. परिवार नसलेले लोक भावनाशून्य असतात. भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. तो भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेसने सार्वजनिक उपक्रमांचा पाया रचला. हा पाया श्री. मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला. तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती देशात उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने, ‘ठाकरे’ घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंध भक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱ्यांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार? असे म्हणत सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.