'बलात्काराचे आरोप असणाऱ्यांसोबत बसतात, तेव्हा चित्रा वाघ काय गांधारी होतात का?'
अमोल धर्माधिकारी | मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून वॉर रंगले आहे. उर्फीच्या बोल्ड लूकविरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर उर्फीवरुन चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कार्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या खासदारांसोबत व्यासपीठावर बसतात, तेव्हा चित्रा वाघ काय गांधारीच्या रुपात असतात का, असा जोरदार पलटवार त्यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत १०९०७ तक्रारी आल्या आहेत. यापैकी ९५२० तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत, तेंव्हा आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही, असा टोला त्यांनी चित्रा वाघ यांनी लगावला आहे. त्यांना महिलांवर अन्याय झालं की वेदना होतात. त्यांनी मंगेश मोहिते, राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख यांनी महिलांवर केलेल्या अन्यायाकडे ही त्या लक्ष घालतील आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्या पीडित महिलांना न्याय मिळवून देतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे, बलात्काराचे आरोप आहेत, असे खासदार राहुल शेवाळे एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात, तेव्हा ताई (चित्रा वाघ) या काय गांधारीच्या रुपात असतात का? असा प्रश्न पडतो, अशी कडाडून टीका चाकणकर यांनी केली आहे.
कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल. पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातून ही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेंव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग याचे समर्थन करतंय का? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब. कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही, असे सवाल त्यांनी महिला आयोगाला विचारले होते.