पवार कुटुंबात फुट पडल्याच्या दाव्यावर रोहित पवारांचे भाष्य; म्हणाले, कितीही तोडलं तरी...
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असताना गेल्या काही दिवसांत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून पवार कुटुंबात फुट पडल्याचे दावे केले जात आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. कुटुंब एक राहणं ही त्या कुटुंबाची खरी ताकद असते. पण राजकारणात अनेकांनी पवार कुटुंबीयांना स्वप्नात कधीच तोडलं आहे. पण लोकांनी स्वप्नात कितीही तोडलं तरी आम्ही एक आहोत, पवार कुटुंब एक आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले रोहित पवार?
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, समाजात आणि राजकारणात भांडणं लावणारे अनेक जण भेटतील. कारण त्यांचं भांडणं लावल्याशिवाय काही शिजतच नसतं, कारण त्यांना सकारात्मक काही दिसत नाही. त्यातुन भांडणं लावुन कुटुंब फोडण्याचे काम त्यांच्याकडून सुरु असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. पण आपण कुटुंब एक ठेवुन व्यवसायांचा विस्तार करा, असा सल्ला रोहित पवार यांनी यावेळी दिला.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राने संपुर्ण देशाला दिशा दिली. पण आज महाराष्ट्राचा वापर इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी केला जातोय की काय? हाच प्रश्न आहे. आज आपली खरी अस्मिता आहे. आणि ती टिकवण्यासाठी जे काही आपल्याला जे काही करायचं आहे ते करावचं लागेल, असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.