हेच का 'जनसामान्यांचं' भरकटलेलं 'दिशा'हीन सरकार; रोहित पवारांचा शिंदेंना टोला
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन सभागृहात वातावरण तापले आहे. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा स्थगित करावे लागले आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहे. हेच का 'जनसामान्यांचं' भरकटलेलं दिशाहीन सरकार? सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जाण्याचीच ही त्यांची तयारी दिसतेय, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.
तसेच, खासदार राहुल शेवाळे कधी संसदेत बोलत नाहीत. काल बोलून बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यात काहीच तथ्य नाही, असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता.
दरम्यान, भरत गोगावले यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर नितेश राणेही बोलायला उभे राहिले. A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.