अदानींच्या गाडीचे स्टेअरिंग रोहित पवारांच्या हाती
देशातील सर्वात धनाढ्य उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीला भेट दिली. बारामतीमधील विज्ञान केंद्राचे गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर पाहायला मिळाले. गौतम अदानी यांच्या आदरातिथ्यामध्ये कोणतीही कसूर राहणार नाही, याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून घेतली जात होती. रोहित पवार हे स्वत: बारामती विमानतळावर गेले होते. (Rohit Pawar was also present at the inauguration of Science and Innovation Activity Center at Baramati by Gautam Adani)
गौतम अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी स्वत: चालवत त्यांना विज्ञान केंद्रावर दाखल केले.
या कार्यक्रमाला अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. या सगळ्यानंतर सध्या राज्यात शरद पवार आणि अदानी एकत्र आल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत उभारण्यात आलेल्या सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे गुरुवारी उद्घाटन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे. या विज्ञान केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनात ३६ जिल्ह्यातील २५० वैज्ञानिक प्रकल्प सहभागी झाले होते. या प्रदर्शनाचा आज समारोप होत आहे.