Rohit Pawar : ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी
ब्रिक्स इंडिया नावाच्या कंपनीला सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलमध्ये जेवण पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. ही कंपनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांशी संबंधित आहे. या संदर्भातला जीआरही काढण्यात आला आहे. ब्रिक्स कंपनीवर मुश्रीफांच्या सरसेनापती साखर कारखान्यात मनी लॉन्डरिंग केल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणात कंपनीच्या कार्यालयांवर आणि संचालकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. त्यामुळं ब्रिक्स कंपनीचं ग्रामविकास विभागातील कंत्राटही रद्द करण्यात आलं होतं. आता त्याच कंपनीवर सरकार कसं मेहेरबान झालं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लाँडरींग झाल्याचा गंभीर आरोप #मविआ सरकारच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा आणि कोल्हापूर दौरा या माध्यमातून रान उठवलं आणि आज याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं.. यामुळं राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करुन लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.