उमेदवारी नाकारणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नाही : शाहू राजे
कोल्हापूर | सतेज औंधकर : विधानसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे (Sambhaji Raje) यांना उमेदवारी शिवसेनेने (Shivsena) नाकारल्यानंतर छत्रपती घराण्याचा अपमानाचा केल्याची टीका शिवसेनेवर सर्वच स्तरावरुन करण्यात आली. परंतु, शाहू राजे (Shahu Raje) यांनी छत्रपती घराण्याचा अपमानाचा प्रश्नच येत नाही, हे राजकारण आहे, असे स्पष्ट केले आहे.
शाहू राजे म्हणाले की, छत्रपती घराण्याचा अपमानाचा प्रश्नच येत नाही, हे राजकारण आहे. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही, त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. राजकारणात संभाजीराजेंचे सर्व निर्णय व्यक्तिगत होते. घराण्याची किंवा माझी संमती घेऊन पावलं उचलली नाहीत.
स्वराज्य पक्ष स्थापन करणार आणि इकडे राज्यसभा मिळवणार हे गणित मुळातच चुकीचे आहे. स्वराज्य पक्ष स्थापन करायचाच होता तर तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नव्हती. राज्यसभा पाहिजे होती तर भाजपला भेटले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होते. यासाठी दोन ते तीन महिन्यापासूनच ही प्रक्रिया सुरु करायला पाहिजे होती, यासाठी त्यांनी खूप उशीर केला, असेही त्यांनी सांगितले.
संभाजीराजेंनी पाठिंबा मागितला यावर बोलताना शाहू महाराज म्हणाले, पाठिंबा पाहिजे होता तर इतर नेत्यांकडे सुद्धा जाणं गरजेचं होतं. एकीकडे राज्यसभेसाठी गणित जुळवून आणता तर दुसरीकडे पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकलाच, असेही शाहू राजेंनी म्हंटले आहे.
संभाजीराजेंनी निर्णय घेतल्यानंतर विनिमय करायला माझ्याकडे ते कधीच आले नाहीत. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे धावून येतील. संभाजीराजेंचा हा अंदाज चुकला. राजकारणामध्ये असं एकदम काहीच होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात. छत्रपती घराण्याचे असल्यामुळं सगळे आपल्याकडे यायलाच पाहिजे, असेही होतं नाही. छत्रपती घराण्याला पाठिंबा द्यायचा की नाही हा प्रश्न नव्हताच. तर संभाजीराजेंना पाठिंबा द्यायचा की नाही हा मुळ प्रश्न होता, असे स्पष्टीकरणही शाहू राजेंनी दिले आहे.
संभाजीराजेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज्यभर पक्ष मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. यावर स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील, असे शाहू राजेंनी म्हंटले आहे.