एकनाथ शिंदे पहिल्यांदाच हॉटेलबाहेर; राऊतांना दिले थेट आव्हान
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार हे गेल्या ७ दिवसांपासून गुवाहाटीत आहे. यामुळे राज्यात सध्या मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे हॉटेलच्या गेटवर येत स्पष्ट भूमिका मांडली. गुवाहाटीमधील आमदार संपर्कात असल्याचा दावा खोटा आहे. कोण संपर्कात आहेत त्यांची नावं सांगून दाखवा, असे आव्हान त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, दीपक केसरकर हे आमचे प्रवक्ते आहेत आतापर्यंतची माहिती त्यांनीच दिली आणि पुढची माहिती देखील तेच देतील. शिंदे गटाच्या भूमिकेबद्दल सर्व माहिती दीपक केसरकर पत्रकारांना पुरवतील. पुढची भूमिका आम्ही लवकरच स्पष्ट करू, असेदेखील त्यांनी सांगितले.
तर, संजय राऊत सातत्याने आमदारांना जबरदस्तीने नेल्याचा दावा करत आहेत. यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून सर्व आमदार आपल्या मर्जीने आले आहेत. व सर्व आनंदात आहेत. बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचेही शिंदेंनी सांगितले. तर, गुवाहाटीमधील आमदार संपर्कात असल्याचा दावा खोटा आहे. कोण संपर्कात आहेत त्यांची नावं सांगून दाखवा, असे आव्हान त्यांनी संजय राऊतांना दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. सातव्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत बंडखोर आमदारांना ११ जुलैपर्यंत संरक्षण दिले. त्यानंतर भाजपमध्ये बैठका आणि घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे.