पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग येथेच होणार; रविंद्र चव्हाणांची स्पष्टोक्ती
मुंबई : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार, अशी स्पष्टोक्ती चव्हाणांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे मत रविंद्र चव्हाण यांनी ट्वीट करून म्हटले आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणून-बुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती मंत्री चव्हाण यांनी जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत, असे निर्देश रविंद्र चव्हाण यांनी दिले.