महाराष्ट्रातही भाजपचाच झेंडा फडकेल; रवी राणांचा विश्वास
सूरज दहाट | अमरावती : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने आघाडीवर आहे. भाजपची गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. गुजरातमध्ये भाजपाने दीडशे पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. या निकालावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी राणा म्हणाले की, गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा करिष्मा आहे. नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला आहे. गुजरात देशाला विकासाचे उदाहरण आहे. तर 2024 च्या लोकसभेत सुद्धा मोदी बाजी मारतील. तसेच मोदी, अमित शहा व देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुद्धा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर, आघाडीत बिघाडी झाली आहे त्यामुळे भाजपचा झेंडा राज्यात फडकेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. राज्यातील 182 जागांपैकी भाजप 150 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 20 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी सात जागांवर आघाडीवर आहे. तर इतरांना तीन जागा मिळत आहेत. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे.