नवनीत राणांना बच्चू कडूंची खुली ऑफर; रवी राणा म्हणाले...
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकीट पक्षाकडून लढावं, अशी खुली ऑफर बच्चू कडू यांनी दिली आहे. यावर आता आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बच्चू कडू यांनी आपले आमदार सांभाळले पाहिजे, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रवी राणा म्हणाले की, नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार आहेत. बच्चू कडू आघाडी धर्म पाळवा. बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू, असेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केलं तर त्याचे परिणाम होतील, असा इशारा देखील रवी राणा यांनी बच्चू कडूंना दिला आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर आहेत. कारण त्यांना प्रहारवर विजयी होणार हे शाश्वती नाही, असा खळबळजनक दावाही रवी राणा यांनी केला आहे. यामुळे बच्चू कडू यांनी आपले आमदार सांभाळले पाहिजे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
नवनीत राणा यांनी आमच्या पक्षाकडून लढावे अन्यथा अमरावती मतदार संघ आम्हाला द्यावा. प्रहार, युवा स्वाभिमानकडून नवनीत राणा यांनी अमरावतीमधून लढावं, अशी ऑफर बच्चू कडू यांनी दिली होती. मी महायुतीमध्ये आहे. पण नात घट्ट नाही. मी पक्षांच्या बैठकांना जात नाही. लोकसभेत कोणाच्या सोबत राहायचं. कुठे लढायच याचा निर्णय फेब्रुवारीत घेऊ, असेही त्यांनी म्हंटले आहे.