मध्यवधी निवडणुकीबाबत रावसाहेब दानवेंचे भाष्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच शिंदे- फडणवीस सरकार पडेल असे भाकीत विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या दाव्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे सांगितले जात आहे. पण दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारबद्दल खळबळजनक विधान केले आहे. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
“सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. भाजप सेनेची युती तुटली, गेल्या २.५ वर्षांत चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं कुणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली की एक रात्रीत सरकार गेलं. आता, असंच राजकारण चाललं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणार, याचा कोणी अंदाज लावला का? असे केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
मध्यावधी निवडणुका राज्यात लवकरच लागतील, असा अंदाज महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेते मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही असे काही संकेत एका बैठकीत दिले होते. जानेवारी महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे आता केंद्रीय मंत्र्यांना असे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.