'पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर...'

'पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर...'

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत रावसाहेब दानवे यांची सूचक प्रतिक्रिया
Published on

अभिजीत हिरे | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोणाचेही पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही. पण, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर स्वागत, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भाजपाला कोणता पक्ष फोडत नाही. पण, कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. अशोक चव्हाण यांची आता चर्चा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस व अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले.

पण, त्यांच्यामध्ये असंतोष असेल तर त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण, आम्हाला जेव्हा गरज पडेल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ. आज आम्हाला कोणाची गरज नाही. कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आलं तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावं ही वैचारिक लढाई आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारले असता दिली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी भाजपचा वरिष्ठ नेते मंडळींची भेट घेतली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाल्यानं नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये बंड होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. तर, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यामध्ये दोन माजी कॉंग्रेस मंत्र्यांना स्थान मिळणार असल्याचेही सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com