संजय राऊतांनी समोर जावे, पण...; रामदास कदमांची हात जोडून विनंती
सचिन बडे | औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विनंती आहे की समोर जा. पण, अन्य कोणाची भांडी घासू नका, अशी विनंती बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी हात जोडून केली आहे. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता असून अटकेची टांगती तलवार आहे.
सध्या महाराष्ट्राचे वातावरण गढूळ होत चालले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूला सर्व बडवे जमा झाले आहेत. त्यामुळे इतके वर्ष काम करणाऱ्या रामदास कदम यांना बाजूला बसवले. उद्धव ठाकरे यांच्याकडे गद्दारांची नेमकी व्याख्या काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्याकडे असलेले काही आमदार गद्दार आहेत की मोठ्या संख्येने बाहेर पडणारे आमदार गद्दार आहेत, असा संतप्त प्रश्न रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थितीत केला.
गद्दराची नेमकी व्याख्या त्यांनी सांगावी, उठसूट गद्दार पण हे का झालं, याचा विचार करणार का नाही? पक्ष वाचविणार का नाही? बाळासाहेबांचे विचार वाचविणार का नाही? का शरद पवारांचे विचार पुढे घेऊन जाणार आहात, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
खेडमधला राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची यादी काढली. त्यावर कारवाईची मागणी केली. मात्र, कारवाई झाली नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता उध्दव ठाकरे यांनी कारवाई करण्यास मनाई केल्याचं सांगण्यात आले. त्यावर माहिती घेतली असताना शरद पवार यांनी शब्द दिल्याने कारवाई करण्यात आली नाही, असे समोर आले, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
माझ्या मुलाला उद्ध्वस्त करण्याचे काम नेहमी केले गेले. मात्र, मतदारांना माहिती होत अन्याय होतो आहे. ते योगेशच्या मागे उभे राहिले. मात्र, दापोली येथील शिवसेनेकडे असलेली नगर परिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम अनिल परब यांनी केले, असा आरोप करत आता सांगा कोण गद्दार आहे, अभ्यास केलात का, असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थितीत केला.
अर्जुन खोतकर मला काही बोलले नाही. त्यांनी मला बोलताना फक्त मी मतदार संघात जाऊन भूमिका घेतो, अस सांगितलं होते. अर्जुन खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला. तो भेटला की त्याला विचारणार आहे. त्याने पैसे खाल्ले म्हणून तो घाबरत आहे, अस बोलणं चुकीचं आहे. मी त्याला वाघ समजतो. तो सुभाष देसाई सारखं शेळी कधी झाला. संजय राऊत यांना विनंती आहे की समोर जा. पण, अन्य कोणाची भांडी घासू नका, अशी विनंती रामदास कदम यांनी हात जोडून केली.