...तर सरकारमधून आपण बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही; आठवलेंचे विधान
यवतमाळ : खासदारांच्या निलंबनावरुन सध्या राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास केंद्र सरकारला आपला पाठिंबा राहणार नाही. सरकारमधून आपण बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही, असे विधान रामदास आठवलेंनी केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना तरुणांनी संसदेत उड्या मारल्या. इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. प्रेक्षक गॅलरीची उंची कमी आहे. सुरक्षा यंत्रणेकडून मोठी चूक झाली. तरुणांनी आंदोलनासाठी चुकीची तारीख निवडली. याच दिवशी पाकीस्तानच्या आतंकवाद्यांनी संसद भवनात हल्ला केला होता. नवीन संसद भवनाला संविधान सदन असे नाव देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे संविधान बदललं जाणार नाही. विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटा आरोप केला जात आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक समाज तोडण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
देशात जातीभेद निर्मुलनाचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांचा सर्वच जाती-धर्माच्या लोकांना फायदा झाला आहे. केंद्र सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. सरकारवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु, चर्चा करण्याऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण केला जात आहे. सरकारची चर्चा करण्याची तयारी आहे. वेलमध्ये उतरून खासदारांनी घोषणाबाजी करणे चुकीचे आहे. लोकशाही धोक्यात आणण्याचे काम विरोधकांकडून होत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास केंद्र सरकारला आपला पाठिंबा राहणार नाही. सरकारमधून आपण बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु, ते संविधान बदलणार नाही, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाही. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाही. जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. परंतु, जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रामदास आठवलेंनी जरांगेंना केला आहे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, त्याशिवाय जातींची टक्केवारी कळणार नाही. टक्केवारीनुसार आरक्षण मिळू शकेल, असेही त्यांनी म्हंटले आहे