ओळखलंत का? हे तर बाळासाहेबांचे 'टिनू'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो व्हायरल
मुंबई : दमदार भाषणशैली, आक्रमक म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे सर्वांनाच माहित आहे. राजकीय वर्तुळातही त्यांचे स्वतःचे असे वेगळे स्थान आहे. परंतु, राजकीय आयुष्याव्यतिरीक्त त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. नुकताच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. अशातच त्यांच्या लग्नाचा फोटो व पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
काय आहे लग्नपत्रिकेत?
जय महाराष्ट्र,
आमचा टिनू हा हा म्हणता स्वरराज झाला नि राजा म्हणून लग्नाला उभा राहिला. मोहन वाघ नि पदमश्री वाघ यांची सुकन्या चि. शर्मिला हिने राजाला जिंकलं आणि ते लग्नाला तयार झाले. आता लग्नाचे लाडू घ्यायलाच हवे, पण त्याला मुहूर्तही हवा, म्हणून आपण सर्वांनी मंगळवार दिनांक ११ डिसेंबर ९० रोजी वनिता समाज, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे येऊन या दोघांनाही मनापासून आशीर्वाद द्यावेत, ही आमची इच्छा, मात्र आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नयेत, असा आशय लग्नपत्रिकेवर आहे. यासोबतच बाळासाहेब केशव ठाकरे, मीना बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत केशव ठाकरे, मधुवन्ती केशव ठाकरे अशी नावे आहेत.
एका मुलाखतीदरम्यान राज व शर्मिला ठाकरे यांनी लव्हस्टोरीविषयी सांगितले होते. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची पहिली भेट ही रूपारेल कॉलेजच्या आवारात झाली होती. या भेटीनंतरच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर शर्मिला यांच्या प्रेमात पडलेले राज ठाकरे हे वारंवार फोन करत त्यांच्याशी गप्पा मारू लागले. शर्मिला ठाकरे या मराठी सिनेमा छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत.