राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार; वसंत मोरे म्हणाले, आमच्याही अंगाला लाल माती लागलेली, पण...
पुणे : पुण्यात लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील टीकेमुळे चर्चेत आलेले उत्तर प्रदेशातील भाजपा नेते ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे ब्रिजभूषण सिंह यांचा विरोध करणार असल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. याबाबत मनसे नेते वसंत मोरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे ब्रिजभूषण सिंग यांना कोणताही विरोध करणार नसल्याचे मोरे यांनी सांगतिले आहे.
वसंत मोरे म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांना मनसे कोणताही विरोध करणार नाही. खुद्द राज ठाकरे यांनीच या संदर्भातले आदेश दिले आहे. अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता. दहा-दहा वर्षे आमच्या अंगाला सुध्दा लाल माती लागलेली आहे. यामुळे कुस्त्या कशा व काय खेळायच्या हे आम्हाला सुध्दा माहिती आहे. फक्त पक्षादेश आणि राज ठाकरेंचा आदेश म्हणून मनसेसैनिक शांत आहेत, असे देखील त्यांनी म्हंटले आहे.
यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. ते म्हणले की, राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध होता. मी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली होती की, संतांची, जनतेची, पंतप्रधानांची माफी मागा. आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य करण्यास मी सांगितलं होतं. माझ्या दौऱ्याला ते विरोध करणार नसतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला ब्रिजभूषण सिंह यांनी वारंवार आव्हान दिले होते. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन उत्तर भारतीयांना त्रास दिला असून, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी ब्रिजभूषण सिंह यांनी केली होती. तर, ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना मी नक्कीच माझा हिसका दाखवेन, असे म्हणत डिवचले होते. यावरुन ब्रिजभूषण सिंह विरुध्द मनसे असा वाद चिघळत होता.