भाजपच्या सांगण्यावरुनच राज ठाकरेंनी लिहीलं पत्र; अरविंद सावंतांचा आरोप
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली होती. यानंतर फडणवीसांनी पक्षाशी व शिंदे गटाशी चर्चा करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेलं हे पत्र भाजपने सांगितल्यामुळेच लिहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अरविंद सावंत म्हणाले, अंधेरीत राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरेपर्यंत बराच वेळ गेला आहे. मधील काळात तमाशा करण्यात आला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे विधानसभेची निवडणूक लागली आहे असं सांगत शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवायला लावलं. यामुळे हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. तर राज ठाकरे यांनी शनिवारीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावरुनच अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी लिहिलेलं हे पत्र भाजपने सांगितल्यामुळे लिहिलं आहे, असा आरोप अरविंद सावंत यांनी लोकशाहीच्या माध्यमातून भाजपवर केला आहे.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) व भाजप-शिंदे गट यांच्यात सामना रंगणार आहे. पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटी घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठींबा देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय एकच चर्चा रंगली आहे.