...अन्यथा राज ठाकरेंना अटक करा; वंचितनं घेतली आक्रमक भूमिका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. मशिदीवरील भोंगे (Loudspeakers) आणि मदरशांबद्दल राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता वंचितने (VBA) राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
मदरसे आणि मशिदीत समाज विघातक गोष्टी घडत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील सभेत केला होता. या प्रकरणी आता वंचित बहुजन आघाडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र असं काही न आढळल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यु.ए.पी.ए. अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी वंचितनं केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुडी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. मदरशांमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. तसंच मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा त्यासमोर हनुमान चालिसा वाजवा असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार काही मनसैनिकांनी मशिदीसमोर भोंगे देखील लावले होते. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.