मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की...; राज ठाकरेंनी टोचले कान
मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती असून राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही खास ट्विटर पोस्टद्वारे सावित्रीबाईंना अभिवादन केले आहे. याचवेळी राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारचे कानही टोचले आहेत. भिडे वाड्याचे अजून एक रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही याची काळजी घ्या, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडेवाड्यात रोवली, त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा सरकारने ह्या अधिवेशनात केली, त्याचं स्वागतच. पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, अजून एक रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पहा, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करून 1 जानेवारीला १७५ वर्षे झाली आहेत. भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केली होती. तर, छगन भुजबळ यांनीही विधानसभेत मुद्दा मांडला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने दोन महिन्यात या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन करण्याची तयारीही राज्य सरकारने आखली आहे.