भाजपकडून युती संदर्भात ऑफर; राज ठाकरेंचा मोठा खुलासा, अंतिम निर्णय...
मुंबई : अजित पवार यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. भाजपकडून आपल्यालाही युतीची ऑफर असल्याचा खुलासा राज ठाकरेंनी केला आहे. यामुळे राज ठाकरे महायुतीला समर्थन देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एमआयजी क्लब वांद्रे येथे पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भाजपकडून आपल्याला युती संदर्भात ऑफर आहे. आपण अजूनही कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेलो नसल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे. आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. अजित पवार ही महायुतीमध्ये आलेले आहेत त्यांचं काय करणार? त्यामुळे अंतिम निर्णय आपण अजून केलेला नाही, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय घोळ चाललेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत कुणी आता महानगरपालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील. त्यामुळे आता ज्या निवडणुका लागतील त्या लोकसभेच्या असतील. आमचे काम चालू राहिल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा अनेकदा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंचे एकत्र पोस्टर्स लावून जाहीर इच्छाही व्यक्त केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांही अधून-मधून सुरु असतात. अशातच, राज ठाकरेंनी भाजपकडून युतीचा प्रस्ताव असल्याचा सांगितले आहे. यामुळे राज ठाकरे कोणाला टाळी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.