चरबी उतरलेली नाही..., मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक
काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दा बाहेर काढला होता. या मुद्द्यावरून राज्यभर वातावरण एकदम तापले होते. मात्र, वाद शांत झाल्यानंतर आज नेस्को सेंटर येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत असताना राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय पुन्हा बाहेर काढला आहे. मात्र, यावेळी त्यांनी अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भोंग्यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
“इतके वर्ष चालू असलेला, इतके वर्ष बोलत असलेला, बाळासाहेब ठाकरेंनी किती वेळा याबद्दल उल्लेख केला, पण उल्लेख केल्यानंतर ती यंत्रणा खालून राबवावी देखील लागते. तिच गोष्ट जी आजपर्यंत बाळासाहेब बोलत आले की मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजेत. मनापासून त्यांची ती इच्छा होती. ती आपण पूर्ण केली. त्याचं कारण आपण भोंगे काढा सांगितले नाही. नाही काढले तर हनुमान चालीसा लाऊ” असे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, या गोष्टीसाठी आपण पुढे निघालो, पण तरीही माझ्या महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांनो अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे भोंगे जोरात चालू असतील, पहिली पायरी पोलिसांत तक्रार करायची. पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलिसांवर कोर्टाचा अवमान केल्याची केस दाखल होऊ शकते. न्यायालयाच्या अपमान केल्याची केस पोलिसांवर होऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांना सांगा”, असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं.