राऊतांचा अभ्यास कमी; नार्वेकरांचा टोला, जनतेने त्यांना माफ करावे
मुंबई : राज्यातील राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या दोन दिवसांत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात, नरहरी झिरवळ यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय नवीन अध्यक्ष बदलू शकत नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तर, यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी राऊतांनी केली. यावर राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांना उत्तर दिले आहे.
बिनबुडाच्या आरोपावर उत्तर देण्याची गरज नसते. सन्मानीय संजय राऊत हे अनेक वेळा मुख्यमंत्री यांचा राजीनामा मागत होते. आता ते थेट अध्यक्ष यांचा राजीनामा मागत आहेत. संजय राऊत यांचा अभ्यास कमी असल्याने त्यांच्याकडून बेजबाबदार वक्तव्य होत आहेत जनतेने त्याला माफ करावे, असा टोला राहुल नार्वेकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
अध्यक्ष केवळ संविधानाने दिलेली माहिती देत आहेत. संजय राऊत टाइमकीपरची भूमिका बजावत आहेत. कायदे मंत्री मुंबईला आले होते. ती केवळ औपचारिक भेट होती. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेच आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांचा संविधानिक अभ्यास कमी आहे. माझा कायद्याचा अभ्यास आहे. मला स्पष्ट दिसून येत की कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ प्रत्येकाला आपल्या जबाबदारी वाटून दिलेल्या आहेत. विधीमंडळाला जे अधिकार दिले आहेत ते संविधानिक अधिकार आहेत, यामध्ये कोणीतीही एजेन्सी हस्तक्षेप करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात चिन्हविषयी निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं की हा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा. विधिमंडळातील अधिकारावर कोणतीही गदा आणणार नाही याची मला खात्री आहे, असा विश्वासही नार्वेकरांनी यावेळी व्यक्त केला.
जोपर्यंत अध्यक्ष निर्णय देत नाहीत तोपर्यंत कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. मी ज्या पदावर आहे त्याची गरिमा राखण गरजेचं आहे. राज्यातील आणि देशातील जनतेसमोर एखाद वक्तव्य वारंवार केलं तर जनता जास्त मनावर घेत नाही. त्यामुळे वक्तव्य करणाऱ्यांनी जबाबदारी बाळगून वक्तव्य करावं. संजय राऊत यांनी जबाबदारी ओळखून वक्तव्य करावे, असा सल्लाही त्यांनी राऊतांना दिला आहे.
कायद्याची तरतूद काय आहे त्यावर आपलं म्हणणं मांडणं ठीक आहे. झिरवळ साहेब वरिष्ठ आहेत त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. झिरवळ हे असे पहिले आहेत की त्यांना त्यांचा वकालतनामा कोर्टात सादर करावा लागला होता, असेही राहुल नार्वेकरांनी सांगितले आहे.