वीर सावरकर मुद्द्यावरुन अखेर राहुल गांधींचे एक पाऊल मागे; ठाकरे गटासाठी घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या भाष्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. यावरुन शिंदे गट व भाजपने उध्दव ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. वीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आव्हानच उध्दव ठाकरेंना देण्यात आले आहे. तर, उध्दव ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर अखेर आज राहुल गांधींनी पाऊल मागे घेतले आहे.
राहुल गांधींनी वीर सावरकरांचे नाव घेत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यावरुन भाजपने राहुल गांधींसोबत उध्दव ठाकरेंवरही टीकेची झोड उठवली होती. उध्दव ठाकरेंनी कॉंग्रसेची साथ सोडावी व महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे जाहीर आव्हान भाजपकडून देण्यात आले होते. तसेच, राहुल गांधी यांनी केलेले अवमानाविरोधात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. तर, उध्दव ठाकरेंनीही वीर सावरकर आमचे दैवत असून अपमान सहन करणार नाही, असा इशाराच राहुल गांधींना दिला होता. व विरोधी पक्षाच्या बैठकीवरही ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या वादात मध्यस्थी केली आहे.
अशातच, आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत 18 विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्व पक्षव इतर कोणत्याही विरोधी पक्षाच्या आणि विशेषतः राहुल गांधी मित्रपक्षांच्या भावनिक मुद्द्यांवर वक्तव्य करणार नाहीत यावर सहमती झाली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर वक्तव्य करणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी आश्वस्त केले आहे. तसेच, काँग्रेसला सक्रियता वाढवण्याची गरज असून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सतत संपर्कात राहणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.