Rahul Gandhi in Lok Sabha: मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या
आज सभागृहात राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत भाषण केलं. राहुल गांधी अविश्वास ठरावावर बोलले. विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. राहुल यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मागच्या वेळी अदानीच्या मुद्द्यावर मी बोललो होतो. त्यामुळे ज्येष्ठ नेते त्रस्त झाले. पण तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही. आज माझ्या भाषणात मी अदानींवर बोलणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. शांत राहू शकता. माझं आजचं भाषण दुसऱ्या दिशेनं जात आहे. मला माझ्या मेंदूतून नाही तर हृदयापासून बोलायचं आहे आणि मी तुमच्यावर अजिबात टीका करणार नाही.
तसेच ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण तुमच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केलंय, तोडलंय. काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. मणिपूरचे सत्य हेच आहे की, मणिपूर आता उरलेलंच नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत.
राहुल गांधी बोलल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मणिपूरमध्ये सात दशकात जे काही घडलं त्याला काँग्रेस जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे.