Manipur Incident : राहुल गांधींनी ट्विट करुन केली मोदींकडे 'ही' मोठी मागणी
मुंबई: मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना लाजिरवाणी असून संपूर्ण देशाची बदनामी झाली असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान साधले आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
ही घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशाची बदनामी झाली आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही आणि कायद्याचे एकामागून एक पाऊल टाकले जाईल, असे पंतप्रधानांनी म्हंटले होते.
मोदींच्या या विधानावरुन राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान, हा मुद्दा देशासाठी लाजिरवाणा आहे की नाही हा नाही. तर, मुद्दा हा आहे की मणिपूरच्या महिलांना होत असलेल्या अपार वेदना आणि आघाताचा. हिंसाचार त्वरित थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही मणिपूरच्या घटनेची स्वतःहुन दखल घेत केंद्र आणि मणिपूर सरकारवर ताशेरे ओढले होते. मणिपूरमधील व्हिडिओने खरोखर व्यथित झालो आहेत. अशा घटना अजिबात मान्य करता येणार नाहीत. हे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. सरकारने या प्रकरणी कारवाई करावी. सरकारने कारवाई केली नाहीतर आम्ही करु, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.