अशा बाजार बुणग्यांना भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहिजेत; मनसेची राहुल गांधींवर टीका
मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापले आहे. यावर भाजप व शिंदे गटाने कडाडून टीका केली जात आहे. तर, मनसेही या वादात उडी घेतली असून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा अपमान आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाजार बुणग्यांना भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
तर, राहुल गांधींवरुन संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना काही लोक मिठ्या मारतात या नेत्यांच करायच काय खाली डोक वर पाय, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाशिमच्या मालेगावात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.