Priyanka Gandhi: भाजपला प्रश्न करत प्रियंका गांधी म्हणाल्या...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटांचा कोकणातील पुतळा कोसळल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते दिमाखात अनावरण पार पडलं होतं. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रियंका गांधी पोस्ट शेअर करत म्हणाल्या की, गेल्या वर्षी पंतप्रधानांनी सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले जे अवघ्या 8 महिन्यांत कोसळले. अयोध्येतील देवाचे मंदिर, उज्जैन महाकाल लोकांमध्ये सप्तऋषींच्या मूर्ती, नवीन संसद, महामार्ग, पूल, रस्ता, बोगदा - जे काही बांधले आहे, प्रत्येक गोष्टीत दोष रोज दिसतात.
पंडित नेहरूजींच्या काळात भाक्रा नांगल आणि हिराकुड सारखी डझनाहून अधिक धरणे बांधली गेली, IIT, IIM, AIIMS, विद्यापीठे आणि इतर अनेक संस्था बांधल्या गेल्या, त्या सर्व सुरक्षित आहेत आणि देशाच्या विकासात योगदान देत आहेत.
आमच्या श्रद्धेच्या, महापुरुषांच्या आणि देशाच्या नावाखाली केलेल्या प्रत्येक भ्रष्टाचाराला भाजपला उत्तर द्यावे लागेल.
दरम्यान नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने 4 डिसेंबर 2023 नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभरला होता. परंतु तो वर्षभराच्या आतच कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.