...म्हणून काँग्रेस फुटली नाही; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले कारण
प्रशांत जगताप | सातारा : शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले मात्र काँगेस फुटली नाही, कारण काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार आहे. नवीन युतीबाबत जनतेत तीव्र संताप आणि चीड आहे. मोदी सरकारला पुन्हा निवडून दिल्यास भारतात लोकशाही जिवंत राहणार नाही, असा घणाघात कॉंग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दहिवडी येथील सभेत केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात मणिपूरसारख्या घटना घडत आहेत. महिलांवर, दलितांवर अन्याय होत आहे. याबाबत मोदी बोलत नाहीत. पीडितांना भेटायला तयार नाहीत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना भाजप सरकार पाठीशी घालत आहे ,असा आरोप त्यांनी केला आहे. जाहीर सभेत मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची आणि राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची नावे घेऊन काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सत्तेत घेतले. 53 पैकी नऊ आमदारांना मंत्री केले.
ईडीच्या चौकशीची दहशत निर्माण करून शिवसेना फोडली व सरकार पाडले. पक्षांतर बंदी कायद्यामुळे सरकार पडेल ही टांगती तलवार होती. या भीतीने राष्ट्रवादी काँगेस फोडली. मतदारांच्या विश्वासाचा सौदा केला. दगा, फटका देऊन पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्रात जे हे घडले असे क्वचितचं कुठं घडले असेल. शिंदे सरकारला अजूनही मंत्रिमंडळ तयार करता आले नाही. अद्याप 12 मंत्री पदे शिल्लक आहेत. कोणाला मंत्री पद द्यायचे याची आश्वासने सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
मोठा विषय अवकाळी पावसाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तिकडे शेतकऱ्यांना मदत करायला सरकारला वेळ नाही. मात्र हे सरकार अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.
दरम्यान, आगामी काळात लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी तयार करण्यात आलेली आहे. 70 वर्षात काँग्रेसने जेवढे कर्ज काढले नाही. त्यापेक्षा जास्त कर्ज मोदी सरकारने नऊ वर्षात काढले आहे. पेट्रोल, डिझेलवर तीस लाख कोटींपेक्षा जास्त कर वसूल केला जात आहे. सरकारी क्षेत्र, सार्वजनिक उद्योग विकायचे सुरू आहे. कर्ज, कर वसुली, भाव वाढ, सरकारी उद्योग विक्री, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न दलित व महिलांवर होणारे अत्याचार यामुळे जनतेमध्ये मोदी सरकार विषयी चीड आहे. काँग्रेस आघाडी देशात पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला.