TET Scam : अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला
मुंबई : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींच्या नावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आता सरकार त्याचंच आहे. कदाचित अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील, असा टोला लगावला. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दोन तृतीयांश आमदार फोडताना विलीनीकरणाची अट विसरले. दोन न्यायायाधीशांच्या खंडपीठाने त्यावेळी शपथविधी करण्यासाठी दिलेला निर्णय चुकीचा होता.
राज्यपालांना काही बंधनं नसतात. त्यांनी शपथविधी केला. तीन वर्षे अध्यक्ष निवड थांबमंत्र्या राज्यपालांनी एका रात्रीत अध्यक्ष निवडीला परवानगी दिली. हे सगळं बेकायदेशीर आहे. न्यायालायत हे टिकणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवू. पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आज देशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक वाटते. यामध्ये दोन धागे आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर, दुसरी देशाची हळूहळू वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. उदारमतवादी धोरण शिल्लक राहिल की नाही याबाबत शंका आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे उद्योग बंद झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकारने प्रचंड कर्ज काढलं आहे. आता कर्ज मिळेल पण व्याज खूप जाईल, असेही चव्हाणांनी सांगितले.
यूपीए सरकार गेलं त्यावेळी असणाऱ्या करात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यातून मोदी सरकारला 28 लाख कोटी रुपये मिळाले. तरीही सरकारी कंपन्या विकण्यास सुरुवात केली आहे. सर्व रेल्वे गाड्या अदानी-अंबानी ग्रुपला दिल्या जातील. 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी सध्या आहे, अशी टीकाही त्यांनी केली.