'रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता एका महिन्याच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे होत असल्याची चर्चा राजकीय होत. आधीच्या दौऱ्यात मोदींनी मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. शिवाय मुंबई महापालिकेच्या अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले. तर आज या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधानांनी भाषण देखील केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यावेळी पंतप्रधानांनी उदघाटन सोहळ्यात मराठीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या देशातील मोठ्या शहरांना जोडणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल, अशा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक भारताचं खूपच अभिमानास्पद चित्र आहे. ही ट्रेन भारताचा वेग आणि 'स्केल' अशा दोन्ही गोष्टींचं प्रतिक आहे. आतापर्यंत अशा १० रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले गेले आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
असेअसेल वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक?
सीएसटी शिर्डी ट्रेन सीएसटी स्टेशनवरुन सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटेल. त्यानंतर दादरला सहा वाजून 30 मिनिटांनी, ठाण्याला सहा वाजून 49 मिनिटांनी, नाशिक रोडला आठ वाजून 57 मिनिटांनी तर शिर्डीला अकरा वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. तर सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी शिर्डीहून निघेल. नाशिक रोडला सात वाजून पंचवीस मिनिटांनी, ठाण्याला रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी, दादरला रात्री दहा वाजून 28 मिनिटांनी तर सीएसटीला दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल.