ठाकरेंच्या काळात भोंग्याविरोधात आंदोलन करणाऱ्या राज ठाकरेंनी या सरकारमध्येही आंदोलन करावे; कोणी दिले आव्हान?
जालना : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर आंदोलनही केलं होते. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर हा मुद्दा काहीसा मागे पडला. नेमके याचवरुन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन करणाऱ्या राज ठाकरेंनी या सरकार मध्येही आंदोलन करावे, असे थेट आव्हानच त्यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या काळात मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन करणाऱ्या राज ठाकरेंनी या सरकारमध्येही आंदोलन करावे. रात्री दहा वाजेपासून सूर्य उगवेपर्यंत मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजायला नको, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचे सरकारने पालन करायला हवे, असे देखील तोगडिया यांनी सांगितले.
तसेच, तोफ आणि मिसाईल घेऊन समोर व्हा आणि पाकिस्तानचा नामोनिशाण मिटवा. आम्हाला पृथ्वीच्या नकाशावर पाकिस्तानचा नकोय. पाकिस्तानचा नामोनिशान मिटवून अखंड हिंदू राष्ट्र बनवायचं माझ्या जीवनाचे स्वप्न आहे, असेही प्रवीण तोगडिया यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत राज ठाकरे यांनी मुंबई शिवाजी पार्क येथील गुडीपाडवा मेळाव्यामध्ये, भोंगे हटावचा एल्गार केला होता व सरकारला विनापरवाना सुरू असलेले भोंगे बंद करण्याबाबत ४ मे पर्यंत अल्टीमेटम दिला होता. मशिदीवरील भोंगे जर बंद झाले नाहीत तर त्यासमोर दुपट्ट आवाजात हनुमान चालीसाचे पठन करण्याचे आदेशही मनसैनिकांना दिले होते. यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत अनेक ठिकाणचे भोंगे उतरविले होते.