उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार; दरेकरांचा पलटवार
मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. याला आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खरे गद्दारी उध्दव ठाकरे यांनीच केली असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज ते पत्रकार परिषद बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपाचा त्यांना पोटशूळ आहे. कुठलीही गोष्ट भाजपशिवाय पूर्ण होत नाही. २०१९ सालचा जनाधार युतीला होता. तेव्हा त्यांनी प्रतारणा केली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. कलम ३७० रद्द करण्याचे बाळासाहेब यांचे स्वप्न होते. ते अमित शाह यांनी पूर्ण केले. आता कोणताही मुद्दा मिळत नाही म्हणून कुसपट काढत आहेत, असाही निशाणाही त्यांनी साधला आहे.
बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, असा घणाघात उध्दव ठाकरेंनी शिंदेंवर केला होता. यावर बोलताना विनाशकाले विपरीत बुद्धी, बुडत्याचा पाय खोलात अशा म्हणी म्हणत प्रवीण दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृती संपवली आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्री करण्याची गरज होती का? तुम्ही केलेल कृत्य विसरून दुसऱ्यावर काय बोलताय. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
दरम्यान, राज्यातील जनतेच्या बँक खात्यात ३००० रुपयांची ‘दिवाळी भेट’जमा करा, अशी मागणी आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. यावरही प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर १०० रुपयात जर गोष्टी मिळतायत तर नाना त्यावरही का आक्षेप घेत आहेत. नाना पोपटपंची करण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत, असा टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.