शरद पवारांवर टीका करु नये हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तरच मानेन; आंबेडकरांचा राऊतांवर निशाणा
लातूर : शरद पवार हे भाजपबरोबर असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली होती. त्यांच्या विधानाने मोठा गदारोळ निर्माण झाला असून शिवसेना वंचित युतीत वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आज संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी सामील व्हायचं असेल तर शरद पवार यांच्याविषयी आदर ठेवून बोललं पाहिजे, असा इशारा आंबेडकरांना दिला आहे. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीत यायचं असेल तर असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. मात्र, यावर उत्तर देत प्रकाश आंबेडकर यांनी हेच जर उद्धव ठाकरे यांनी हा सल्ला दिला तर मानेन, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका यावेळी केली आहे
आताची आमची युती ही शिवसेनेसोबत आहे. उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न चालू आहेत की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ. त्यांचे दोन पार्टनर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. त्यांच्यासोबत उध्दव ठाकरे बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश येईल, अशी आशा आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
भाजपला कमी लेखू नका भाजप कुठल्याही स्तराला जाऊ शकते. त्यांची एक पॉलिसी आहे भांडणं लावणे, मतभेद वाढवणे. त्यांच्या ज्यावेळी लक्षात येतं की आपण सरळ जिंकत नाही. तेव्हा त्यांची एक पॉलिसी आहे की भांडणं लावणे, अशी टीका भाजपा पक्षावर प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
भाजपशी आमचं पहिल्यापासून टोकाचे मतभेद आहेत. आरएसएस व भाजप हे मनुस्मृति मानते आमचा हा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीमध्ये काम करणार असतील तर आम्ही भाजपासोबत बसायला तयार आहोत, असे मोठे विधानही त्यांनी केले आहे.
दरम्यान, आता एमआयएमसोबत युती करणार नाही. एमआयएमने 100 जागांसाठी अट्टाहास केला तो योग्य नव्हता. त्यामुळे आम्हाला वेगळं व्हावं लागलं, असेही प्रकाश आंबडकर यांनी स्पष्ट केले आहे.