सध्याचं सरकार चोरांचं, प्रकाश आंबेडकरांची शिंदे- फडणवीस सरकारवर टीका
राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. या विधानावरून वातावरण अद्यापही शांत झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूर विधानभवनावर महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला होता. यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
मोर्चामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ''महाराष्ट्र सरकार लोकांच्या प्रश्नात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील गुंत्यामध्ये अडकले आहे. सध्याचं सरकार हे चोरांचं सरकार. हे सरकार बदलायला हवं. असे देखील ते म्हणाले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील मला तुमचा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करायचे आहे. तो बघायला 5 लाख लोक येतील. दादा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. मी म्हणतो चंद्रकांत पाटील खरे म्हणाले. त्यांनी कबुली दिली की भाऊराव पाटील आणि बाबासाहेबांच्या संस्था लोकवर्गणीतून उभ्या झाल्या. मात्र हे म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी हे कबूल केले की आरएसएसच्या सर्व संस्था खोका संस्कृतीतून निर्माण झाल्या आहे.