जम्मू-काश्मीरमध्ये ४ जवान शहीद; मोदी तुमची ५६ इंचाची छाती कुठंय? आंबेडकरांचा सवाल
भूषण शिंदे | पुणे : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. 20 डिसेंबरपासून सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी यांची ५६ इंचाची छाती कुठे आहे? त्या छातीत काय फरसाण, ढोकळा, भजे भरले आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. ५६ इंच छाती नाही तर, ही २४ इंची मागे पडलेली छाती आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
जम्मूमधील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळाल्यानंतर 20 डिसेंबरच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील थानामंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर गोळीबार केला.
या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी या हल्ल्यात देशाचे 4 जवान शहीद झाल्याचं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं. कारवाई सुरू असून पुढील माहिती काढली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनास्थळावरून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये लष्कराच्या दोन वाहनांच्या तुटलेल्या काचा दिसत आहेत.