Praful Patel
Praful PatelTeam Lokshahi

Praful Patel : भाजपचा विजय म्हणजे काही खूप मोठा प्रलय आला अन्...

राज्यसभा निवडणुकीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : राज्यसभेची अभूतपूर्व नाट्यमयरित्या निवडणूक रंगली होती. यात भाजपचा (BJP) विजय तर शिवसेनेचा (Shivsena) पराभव झाला. या पराभवावर अनेक चर्चा आता रंगताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत (MahaVikas Aghadi) बिघाडी झाल्याचेही आता बोलले जात आहे. परंतु, भाजपचा विजय म्हणजे काही खूप मोठा प्रलय आला आहे, आमचे सर्व सहकारी आम्हाला सोडून गेले आहे अशी स्थिती नाही. आम्ही याचे विश्लेषण नक्कीच करू खोलात जाऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाचे मत फुटले नाही. आमच्या अधिकृत उमेदवारांनी निश्चित कोटाप्रमाणेच मते दिली आहेत. सरकारमध्ये असलेले आणि पाठिंबा देणारे लहान पक्षही महाविकास आघाडी सोबत राहिले. काही अपक्षांची मते भाजपला गेली आहेत. एक मत अपात्र ठरले. तर आमचे दोन नेते तुरुंगात होते. या सर्व गोष्टींचा परिणाम निकालावर झाला. यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा फटका नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मला स्वतःला 51 मतं घेता आले असते. मात्र, आम्ही 42 चा कोटा ठरवला होता आणि मला 42 मत मिळाली. यानंतर उरलेले राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची 9 मते संजय पवार यांना दिली. तर, मलाच माहीत नाही की मला अतिरिक्त मत कोणाचे मिळाली. माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती कोण आहे हे माहीत नाही. असे माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. मी जर त्यांना संपर्क साधला असता तर 4-5 मत फक्त प्रेमापोटीच जास्त काढले असते, असेही त्यांनी सांगितले आहे.

आता काँग्रेसने 44 मते घेतले. हा संशोधनाचा विषय आहे. मला माहित नाही की त्यांनी पक्षांतर्गत कितीचा कोटा ठरवला होता. मात्र, महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे 42 चा कोटा ठरवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी अधिकृतपणे सांगू शकतो की आम्ही आमचे 51 मत व्यवस्थित वापरले आहे. कुठेही एकाही मताच नुकसान झालेले नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बोलू शकतो. काँग्रेस बद्दल नाही. एक दोन दिवसात आम्ही माहिती घेऊ व त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

तसेच, भाजपचा विजय म्हणजे काही खूप मोठा प्रलय आला आहे, आमचे सर्व सहकारी आम्हाला सोडून गेले आहे अशी स्थिती नाही. आम्ही याचे विश्लेषण नक्कीच करू खोलात जाऊ, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटले आहे.

विधान परिषदेची मतदान प्रक्रिया वेगळी आहे. तिथे गुप्तरित्या मतदान टाकलं जातं. राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी गडबड केली तर कारवाईही होऊ शकते म्हणून एक दोन दिवसात चर्चा करु.

महाविकास आघाडीतील नाराजीसंदर्भात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, कामाबद्दल काही आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तीन पक्षांचे सरकार आहे छोटे पक्ष आणि अपक्ष आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतोच, असेही त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com