पालकमंत्र्यांची शस्त्रक्रिया सुरु असतानाच वीज गुल; मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये करावी लागली पूर्ण
सचिन बडे | औरंगाबाद : अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुविधा नसल्याने अनेकदा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. याचाच प्रत्यय आज पालकमंत्र्यानाही आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची दातांची शस्त्रक्रिया सुरु असतानाच बत्ती गुल झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची दाताची रूट कॅनल म्हणजे दातांची शस्त्रक्रिया झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील घाटी रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक वीज गेली. रुग्णालयात जनरेटर उपलब्ध एकच गोंधळ उडाला होता. अखेर मोबाईलची फ्लॅश लाईट लावून भुमरे यांची शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या संदिपान भुमरे यांची प्रकृती व्यवस्थित असून यशस्वीरित्या दातांची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दरम्यान, संदिपान भुमरेंची शस्त्रक्रिया सुरू असताना मध्येच वीज गेल्याने जिल्ह्यातील सेवा सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जर पालकमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेवेळी वीज जात असेल तर सर्वसामान्यांचे काय होत असेल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.